माझे आणखी सट्ट्याचे प्रयोग [२९ डिसेंबर २०१८]
गोव्यातल्या देशी कसिनोमधल्या अनुभवाने भीड चेपल्यावर आणि खिसा हलका न होता चक्क किंचित जड झाल्यावर आपण आंतर राष्ट्रीय पातळीवर जाऊन खेळले पाहिजे असे माझ्या मनात आले . ते मात्र माझं एक आहे . अर्ध्या हळकुंडाने जास्तीत जास्त पिवळं कोण होतेय अशी स्पर्धा ऑलिंपिकमधे असती तर मी भारताला कित्येक पिवळी धम्मक सुवर्ण पदके मिळवून दिली असती . पण नाही ! ह्या जगात सामान्य आणि साध्या माणसांना आपल्या कर्तबगारीवर काहीतरी देदीप्यमान करुन दाखवण्याची संधी मिळतच नाही हेच खरे . म्हणूनच असे लोक सट्ट्याकडे वळतात ...